। पाली /बेणसे । वार्ताहर ।
ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित ‘स्त्रियांचे आरोग्य’ या पुस्तकाचे प्रकाशन विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव लहाने, पद्मा धामणे राव, पत्रकार राही भिडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. कटके यांच्या मातोश्री आणि सासरे मंचावर उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करून डॉ. गोर्हे यांनी हे फार महत्त्वाचे आणि सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक आहे, अशी पुस्तकाबद्दल प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, स्त्रियांच्या आरोग्याविषयी अनेक पुस्तके आहेत, परंतु हे पुस्तक नेमकी माहिती देते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्त्रियांच्या पर्समध्ये राहील या आकाराचे आहे. त्यामुळे ते हवे तेव्हा वाचता येईल. आज समाज माध्यमातून अनेक प्रकारे उपचार सांगणारे व्हिडिओ टाकले जातात, त्यासाठी तपासणी करण्याबाबत सुचवले जाते. मात्र त्यात किती तथ्य असते याचा विचार करायला हवा. डॉ. कटके यांचे पुस्तक आपल्या मनातील प्रश्नांची सुबोध पद्धतीने उत्तरे देते. वयाच्या विविध टप्प्यांवर होणारे आजार, त्यासाठी घ्यायची काळजी याबद्दल पुस्तकात माहिती आहेच, शिवाय आहारविहार, व्यायामाचे महत्त्व यातून शारीरिक आरोग्यासह मानसिक तंदुरुस्ती कशी राखावी याचेही मार्गदर्शन करते. आरंभी ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले.







