| चिरनेर | प्रतिनिधी |
कमी वेळ, कमी कष्टात जास्त नफा देणारी कडधान्य पिके आहेत. या कडधान्य लागवडीतून शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. मात्र उनाड गुरांच्या आणि जंगली वानरांच्या सततच्या त्रासामुळे येथील शेतकरी मेटा कुटीला आला आहे. येथील शेतकरी कडधान्यासह भाजीपाल्याचीही लागवड मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे त्याचबरोबर येथे विक्रीला येणार्या बाजारी भाज्यांमुळे गावठी भाजी उत्पादकांच्या भाज्यांवर मोठा परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत आहे.
उरण पूर्व विभागातील शेतकरी कारली, मिरची, काकडी, वांगी, टोमॅटो, घोसाळी, दुधी, पडवळ, अशा भाजीपाल्यांची लागवड करीत आहेत. भाजीपाला हे मोठ्या कालावधीचे पीक आहे. उत्पन्न देखील अधिक असून, येथील शेतकर्यांना पनवेल व उरण ही बाजारपेठ उपलब्ध असल्याने भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल दिसत आहेत. कडधान्य हे ओलीतावर घेतले जाणारे पीक आहे. मात्र गुरांच्या आणि वानरांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे येथील शेतकर्यांनी कडधान्य उत्पादनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. कमी मेहनतीने कडधान्याचे ज्यादा उत्पन्न शेतकर्यांना मिळते परंतु उनाड गुरांच्या आणि वानरांच्या त्रासामुळे येथील शेतकरी या पिकांची लागवड करत नाही.
उनाड गुरांचा व जंगली वानरांचा येथील शेतकर्यांना त्रास आहे. परंतु कडधान्य क्षेत्र सुद्धा वाढवायचे आहे. शेतकर्यांना मूग, चवळी, मसूर, हरभराचे बियाणे दिले जाते. जेणेकरून शेतकर्यांचा कडधान्य पीक घेण्याकडे कल वाढला जाईल. तालुक्यातील कडधान्य क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
सुरज घरत
कृषी सहाय्यक अधिकारी उरण
गावठी भाजीपाल्याचे आम्ही उत्पादन घेतो. परंतु गावात बाजारी भाजीपाल्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली गेली असल्याने, आमच्या गावठी भाज्यांना हवी तशी मागणी दिसत नाही. त्यामुळे आमच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.
सुषमा म्हात्रे, सुगंधा म्हात्रे, ताईबाई म्हात्रे
गावठी भाजी विक्रेत्या