पनवेलमध्ये पावसाळ्यापूर्वीच पंप तैनात

Oplus_16908288

| पनवेल | प्रतिनिधी |

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने शहरातील सखल भागांमध्ये पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रोलिक व डिझेल पंप आधीच तैनात केले आहेत. महापालिका प्रशासनाने ही पूर्वतयारी असल्याचे सांगितले असले, तरी मागील वर्षांच्या अनुभवामुळे नागरिकांनी या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मागील पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानंतर पंप सुरू करण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही ठिकाणी पंप सुरू होत नव्हते, तर काही ठिकाणी पाणी उपसण्याची क्षमता अपुरी ठरत होती. परिणामी नागरिकांना तासन्‌‍‍तास पाण्यातून मार्ग काढावा लागला होता. यंदा पावसाच्या आगमनापूर्वीच पंप तैनात करण्यात आले असले, तरी त्यांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली आहे का, ते पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत का आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. तसेच पंप ज्या दिवसापासून जागेवर ठेवले जातात, त्या दिवसापासून त्यांचे भाडे आकारले जात असल्याने करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी महापालिकेकडे महत्त्वाची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी पंप तैनात करण्यात आले आहेत, त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक दर्शविणारे फलक लावावेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क साधता यावा आणि पंप वेळेत सुरू व्हावेत, यासाठी ही व्यवस्था आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version