खा.सुनील तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात सात आणि आठ सप्टेंबर 2021 या दोन दिवसात जवळपास साडेपाचशे मिलीमीटर एवढा पाऊस बरसल्याने वांदेली येथील पूल वाहून गेला तर बोर्ली-मांडला परिसरातील असंख्य दुकानात व घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. असंख्य बोटींचे सुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने या भागातील जनता त्रस्त झाली होती.
याबाबतची माहिती मिळताच खा.सुनील तटकरे यांनी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी खा.तटकरे यांनी सांगितले की, घाबरून जाऊ नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून रीतसर पंचनामे होण्यासाठी लोकांनी महसूल अधिकारी यांना सहकार्य करावे. लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी येथील स्थानिकांनी पुराच्या पाण्यामुळे गावात आलेला चिखल, रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, पूल वाहून गेल्याचे दुःख खासदारांसमोर व्यक्त केले. यावेळी मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील काकलघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वांदेली या गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे.सदर पुलाची पाहणी तटकरे यांनी केली. यावेळी संबंधित अधिकारी यांना सदर पुलाचे काम त्वरित करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.
यावेळी मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी सभापती स्मिता खेडेकर,फैरोज घलटे,मनीष माळी,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य सुबोध महाडिक,संतोष महाडिक, राज पाटील,किरण नाईक,निखिल पाडगे व सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.