पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस पुन्हा धावणार; पाठपुराव्याला यश

20/10/2019 India, Maharashtra prospective image of two Indian train with rail between them with gloomy sky. Train to GOA. overpopulation concept

। पनवेल । वार्ताहर ।
प्रवासी संघ आणि पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समिती यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोरोना कालखंडात बंद असलेली पुणे भुसावळ पुणे (हुतात्मा एक्सप्रेस) पुन्हा एकदा रुळांवर धावणार आहे. रविवारी 10 जुलैपासून सदरची एक्स्प्रेस सेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या एक्स्प्रेसचे ऑफलाइन आणि ऑनलाइन आरक्षण सुरू झालेले असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवासी संघ आणि स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे म्हणाले की आमच्या सदस्यांनी कोरोना कालखंडात बंद झालेल्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केलेली आहे. त्यामध्ये पुणे भुसावळ पुणे, पुणे-इंदोर, निजामुद्दीन-त्रिवेंद्रम, पुणे-सीएसटी प्रगती एक्सप्रेस, पनवेल-पुणे पॅसेंजर या गाड्या प्राधान्यक्रमाने सुरू करण्यात याव्यात अशी आमची मागणी होती. यापैकी निजामुद्दीन-त्रिवेंद्रम, पुणे-इंदोर या गाड्या यापूर्वी सुरू झालेल्या आहेत. पुणे भुसावळ पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा एकदा रुळावर धावणार असल्यामुळे समाधानाची भावना आहे. ही गाडी पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यांना जलद गतीने जोडणारा दुवा समजली जाते. पनवेल- कर्जत मार्गावरून ही गाडी धावत असल्या कारणामुळे प्रवास जलद होतो. चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी, शासकीय सेवक,प्रासंगिक अशा समाजातील विविध स्तरांवरल्या प्रवाशांसाठी ही गाडी वरदान आहे.

प्रवासी संघाचे कार्यवाह तथा रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट म्हणाले की कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेनंतर पॅसेंजर गडांच्या ऐवजी मेमू गाड्या चालवल्या जात आहेत. परंतु प्रवाशांकडून मात्र एक्सप्रेस गाड्यांचे शुल्क घेतले जाते. ते कमी करावे यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कोरोना कालखंडात बंद असलेल्या गाड्या टप्प्याटप्प्याने जुलै अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे आम्हाला रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 22 जून रोजी रेल्वे चे डीविजनल कमर्शियल मॅनेजर एम एल मीना यांच्यासोबत स्थानक सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पुणे भुसावळ पुणे गाडी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती. आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने ही गाडी 10 जुलैपासून सुरू केल्याने आनंद वाटतो.

चिंचवड, आसनगावला थांबा
ट्रेन क्रमांक 11025/26 ही तिच्या नेहमीच्या वेळेवरती धावणार आहे. तसेच या गाडीला चिंचवड, शिवाजीनगर आणि आसनगाव येथे थांबे देण्यासाठी स्थानक सल्लागार समितीची रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

Exit mobile version