नागरिकांकडून समाधान व्यक्त
| तळा | वार्ताहर |
मुरुड-तळामार्गे पुणे बससेवा सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याआधी सुरू असलेली तळा ते पुणे बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने या बसने प्रवास करणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
तळा बसस्थानकातून सकाळी सात वाजता सुटणार्या तळा ते पुणे बसमधून लोणेरे येथे बाटू महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त महाड व पुढे पुणे येथे जाणार्या ज्येष्ठ नागरिकांना ही बस प्रवास करण्यासाठी सोयीची पडत होती. मात्र, अचानक ही बससेवा बंद करण्यात आल्याने या सर्व प्रवाशांना खासगी वाहनाने जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागत होता. तसेच इच्छितस्थळी वेळेत पोहोचता येत नसल्याने मनस्तापदेखील सहन करावा लागत होता. त्यामुळे तळामार्गे पुणे बससेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कित्येक महिन्यांपासून प्रवासीवर्गाकडून मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाने मुरुड, तळामार्गे पुणे बससेवा सुरू केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ही बस तळा बसस्थानकातून सकाळी 6.45 वा. सुटणार आहे. तसेच पुणे येथून दुपारी 1.30 वा. सुटून तळा बसस्थानकात सायंकाळी सहा वाजता पोहोचेल, अशी माहिती तळा वाहतूक नियंत्रक प्रशांत मांदुस्कर यांनी दिली आहे.