| पुणे | प्रतिनिधी |
सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे शहरात हंगामी फ्लू असलेल्या विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे ‘एच 1 एन 1′ (स्वाईन फ्लू) सह ‘एच 3 एन 2′ च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, त्यामुळे कडकडून ताप भरत असल्याचे वगळता इतर लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण मात्र वाढलेले नाही. ही लक्षणे फ्लूविरच्या गोळ्या व मुलांना फ्लूविर हे विषाणूविरोधी औषध दिल्यानंतर लक्षणे कमी होत असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर देतात. याबाबत अधिक माहिती देताना भारती विद्यापीठ रुग्णालयाचे वरिष्ठ नवजात व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, सध्या फ्लू चे रुग्ण वाढलेले आहेत. त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये स्वाईन फ्लूच्या ‘एच 1 एन 1′ या विषाणूंचा स्ट्रेन आढळून येत आहे. त्या खालोखाल हंगामी फ्लू असलेला ‘एच 3 एन 2′ या विषाणूच्या उपप्रकाराचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे मुलांना 102 ते 104 फॅरेनाइट ताप येणे, सोबत थंडी वाजून येणे, खोकला येणे ही लक्षणे दिसत आहेत. हा ताप तीन ते चार दिवस राहतो. काही मुलांमध्ये तापेचे झटके देखील येत आहेत. स्वाईन फ्लूवरील फ्लूविर औषध दिल्यावर तो उतरतो. तसेच, लक्षणांनुसार उपचार दिले जातात. तसेच ‘आरएसव्ही’ ‘ॲडिनो व्हायरस’ या विषाणूंचे देखील प्रमाण दिसून येत आहे मात्र ते तुलनेने कमी आहे.
पुणे शहर स्वाईन फ्लूच्या विळख्यात
