पुणे जिल्हाधिकार्यांनी दिले मनाई आदेश; वाहनचालकांना सोसावा लागणार भुर्दंड
| खास प्रतिनिधी | रायगड |
पुणे आणि दक्षिण रायगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. आदरावाडी आणि डोंगरवाडी घाट परिसरातील रस्ता एका बाजूला खचला आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी दि. 2 ते 5 ऑगस्ट या कालावधीत या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबतचे मनाई आदेश पुण्याचे जिल्हधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यामुळे माणगावमार्गे पुण्याकडे जाणार्या येणार्या वाहनांना चांगलाच भुर्दंड पडणार आहे.
पुणे-मालेगाव-पुणे-रायगड (माणगाव) या राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफचे रुंदीकरणाचे काम चालू आहे. पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफवरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामागवर दरड कोसल्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद केला होता. या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या कडेला महामार्गाच्या हद्दीत पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती मयत व एक व्यक्ती जखमी झाला होता.
1 ऑगस्ट रोजी आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून, रस्ता खचलेला आहे. सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात असून, अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु आहे. वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरु असून, आता महामार्गावरील वाहतूक सदर ठिकाणी एका बाजूनेच सुरु ठेवलेली आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सदर रस्ता अजून खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. शनिवार व रविवार या दिवशी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटनासाठी अनेक लोकांची गर्दी होत असते. यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.