सागर अल्हाट यांची माहिती
। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे महानगरपालिका निवडणुक जवळ आली असून, या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शेकाप पुणे शहर चिटणीस सागर अल्हाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली आहे. यावेळी शेकाप मध्यवर्ती समितीचे सदस्य चंद्रशेखर पाटील, दिपक पाटील, अतुल पिसाळ, महेश वनशिव, सचिन कडाळे, प्रदीप लगस, अनिकेत केदारी, विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सागर अल्हाट म्हणाले की, शिक्षणाचे माहेरघर असणार्या, औद्योगिकरणाची माहिती तंत्रज्ञानाचे एक महत्वाचे केंद्र बनलेल्या आणि झपाट्याने एक महानगर होण्याच्या उंबरठ्यावर आपले पुणे शहर आहे. प्रस्थापित सर्वच पक्षांना या शहराचा कारभार पहाण्याची पुरेशी संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय परंतु याचा नियोजनशून्य, दिशाहिन, पक्षपाती, संकल्पनांचा मागमूस नसणार्या यांच्या कारभाराने या ऐतिहासीक शहरासमोर समस्यांचा डोंगर उभा केला आहे. नागरीकरणाच्या मुलभूत समस्या तर तशाच आहेतच, परंतु या विषम विकासाच्या धोरणामुळे या शहरासमोर निवारा, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोलमडून पडलेली वाहतुक यंत्रणा अशा अनेक समस्यांनी हे शहर ग्रासले असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले आहे.
यानंतर सागर अल्हाट म्हणाले की, आम्ही राज्यातील एक अत्यंत जबाबदार पक्ष म्हणून याबाबत अतिशय संवेदनशील आहोत. आमच्या पक्षाची ताकद तुलनेने जरी कमी वाटत असली तरी आमची विश्वासार्हता या सर्व प्रस्थापित पक्षांपेक्षा मोठी आहे. आम्ही धनशक्तीला नव्हे तर जनशक्तीला महत्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकांच्या समस्यांची आम्हाला जाण असलेने आम्ही सामान्य पुणेकरांचा आवाज निश्चितच बनू शकतो. ही निवडणुक जनतेच्या खर्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच या लढाईत आम्ही या शहरातील सर्व पुरोगामी सामाजिक राजकिय घटकांसोबत उद्यापासूनच संवाद अभियान प्रक्रिया सुरू करीत आहोत. जनतेसाठी लढणारे आमच्यासारखे अनेक सहकारी आम्हाला मिळतील अशी खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.





