| पुणे | वृत्तसंस्था |
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. आज सलग चौथ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वारजे माळवाडी या भागात 50 वर्षीय नराधमाने 36 वर्षांच्या महिलेवर घरात घुसून अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरातील एका सोसायटीतील 36 वर्षीय महिला आपल्या घरात भांडी घासत होती. तेव्हा आरोपीने घरात घुसून आई कुठे आहे आई कुठे आहे असा आवाज देत पीडित महिलेला खाली पाडत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या पीडीतेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि थेट वारजे पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरुन वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान वारजे माळवाडीतच दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय न्याय संहितातसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत वडिलांविरुद्ध आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात गेल्या चार दिवसांत महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. आधी शाळेच्या बस चालकाने एक मुलीवर बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी तीन ते चार जणांच्या टोळीने मित्राबरोबर फिरायला गेलेल्या मुलीला शिकार केले. आणि आता ही घटना समोर आली आहे.