पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

| पुणे | वृत्तसंस्था |

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा 46 धावांनी पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पुणेरी स्ट्रायकर्स संघाने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. यात ऋतुराज तावरे याने 54 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याला शुभम हुलगे आणि निखिल जी यांनी चांगली साथ दिली. प्लॅटिनम क्लबकडून विकास नेहे याने 26 धावांत 3 गडी बाद केले.

विजयासाठी 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा डाव 16.2 षटकांत सर्वबाद 128 धावांवरच आटोपला. प्लॅटिनम संघाकडून अभिजीत काळे आणि प्रज्वल साळुंखे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणेरी स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. आदेश उपाध्यायने 13 धावांत 3 गडी बाद केले, तर महेश चव्हाण आणि निखिल जी यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 78 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या ऋतुराज तावरेला सामनावीर घोषित करण्यात आले.

दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात कॉर्पोरेट क्रशर्स संघाने इलाइट 11 संघावर 15 धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कॉर्पोरेट क्रशर्सने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. आदर्श चढ्ढा याने 51 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 65 धावांची संयमी व आक्रमक खेळी केली. वैभव सक्सेनाने 32 तर निशित कुमारने नाबाद 21 धावांचे योगदान दिले.प्रतिउत्तरा दाखल इलाइट 11 संघाचा संपूर्ण डाव 19 षटकांत 153 धावांवर गारद झाला. हेमंत चौधरीने 26 चेंडूंत 41 धावांची तर मनीष अहलावतने 20 धावांची खेळी केली. कॉर्पोरेट क्रशर्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत इलाइट 11 ला रोखले.

Exit mobile version