बांगलादेशच्या तंझीमला धक्काबुक्की भोवली

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझीम हसन शकीब याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कठोर शिक्षा ठोठावली आहे. टी-20 विश्वचषक दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शकिबला त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला.

रविवारी (दि.16) नेपाळ विरुद्ध बांगलादेश सामन्यात डावाच्या तिसऱ्या षटकात तंझीम हसन आणि नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात धक्काबुक्की झाली होती. दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते की, दोघेही एकमेकांशी भांडणार होते. मात्र इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने परिस्थिती निवळली.

तंझीमने आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्याचा गुन्हा खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य शारीरिक संपर्काशी संबंधित आहे. मैदानावरील पंच अहसान रझा आणि सॅम नोगाज्स्की, तिसरे पंच जयरामन मदनगोपाल आणि चौथे पंच कुमार धर्मसेना यांनी त्याच्यावर हे आरोप केले आहेत. तंझीमने आपला गुन्हा कबूल केला असून त्याने आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.

Exit mobile version