भूमिपुत्रांवर बेकारीची कुऱ्हाड

पंजाब कॉनवेअरने शेकडो कामगारांना नोकरीवरुन काढले

। रसायनी । वार्ताहर ।

मेसर्स पंजाब स्टेट कंटेनर ॲण्ड वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (पंजाब कॉनवेअर) कंपनीतील 160 स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करीत अन्याय केल्याने त्यांच्यावर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. या कंपनीत 15 वर्षांपेक्षा अधिक काळ कामगार काम करीत होते. त्यांना कामावर न घेतल्याने कामगारांनी सोमवार, दि.21 रोजी दुपारी कंपनी गेटसमोर घोषणाबाजी करत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध केला. यावेळी कंपनी गेटबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कंपनीतील कामगारांनी राष्ट्रीय मुळनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे नेतृत्व स्वीकारले असून, कंपनीत एकूण संघटनेचे 350 कामगार आहेत. यातील 160 कामगारांना कोणतेही कारण न सांगता, नोटीस न देता कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे कामगारांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, या कंपनीतील कामगार याअगोदर जिएडी लॉजिस्टिक या कंपनीत 17 वर्षे काम करीत होते. यानंतर जानेवारी 2023 मध्ये मेसर्स अमेरा इन्फ्रालाईन्स प्रा.लि. यात वर्ग करण्यात आले. या दोन्ही कंपन्यांची मालकी मेसर्स पंजाब स्टेट कंटेनर ॲण्ड वेअरहाऊसींग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडेच असल्याचे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी बोलताना सांगितले. यातील कमी केलेल्या 160 स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कामावर न घेतल्यास कामगार कुटुंबियांसह संघटना प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय मुळनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युनिट सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी युनिट अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version