मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात विजयी ‘तिलक’
| धरमशाला | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग 2026 चा 58 वा सामना 14 मे रोजी धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना 6 गडी राखून जिंकला. या हंगामातील एमआयचा हा चौथा विजय होता. मात्र, ते आठ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर कायम आहेत. दरम्यान, पंजाब किंग्सला वाढत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी हंगामाची सुरुवात दणक्यात केली होती, पण आता त्यांनी सलग पाच सामने गमावले आहेत. परिणामी पंजाब 12 सामन्यांतून 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, पंजाब किंग्स संघानं निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात तिलक वर्मा (33 चेंडूंत 75 धावा) आणि विल जॅक्स (10 चेंडूंमध्ये नाबाद 25 धावा) यांच्या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने 19.5 षटकांत 201 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. पंजाब किंग्सच्या गोलंदाजीत अझमतुल्ला ओमरझाईने 2 बळी घेतले, तर मार्को जान्सन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सकडून, अव्वल फळीत केवळ प्रभसिमरन सिंगची फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यानं 32 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी केली. याशिवाय प्रियांश आर्याने 22 तर कूपर कॉनोलीने 21 धावा केल्या. खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या अझमतुल्ला ओमरझाईनं 17 चेंडूंमध्ये 38 धावांची खेळी करुन पंजाब किंग्सला 200 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने चार तर दीपक चहरने दोन बळी घेतले. याशिवाय कॉर्बिन बॉश आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पंजाबचे समीकरण बिघडले
मुंबईचे या मोसमातून बाहेर झाली आहे. त्यामुळे मुंबईला आता तसा काही फरक पडत नाही. मात्र, मुंबई विरुद्ध पराभव झाल्याने पंजाबच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब किंग्स टीमच्या खात्यात आता 12 सामन्यानंतर 5 पराभव आणि 6 विजयांसह एकूण 13 गुण आहेत. पंजाबचे आता 2 सामने बाकी आहेत. पंजाबसमोर या उर्वरित 2 सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असणार आहेत. आरसीबीही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान संपुष्ठात आले आहे. मात्र, लखनौ पंजाबच्या अडचणीत वाढ करु शकते. त्यामुळे पंजाबचा उर्वरित 2 सामन्यांत प्लेऑफसाठी चांगलाच कस लागणार आहे.
