जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध‌ पाणीपुरवठा

पाणी स्त्रोतांची करण्यात आली जैविक तपासणी
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे होणाऱ्या साथरोगाच्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. यामधील प्रयोगशाळेत तपासलेल्या १ हजार ८७ पाणी नमुन्यांपैकी १ हजार ७५ नमुने शुद्ध आढळून आले असून, केवळ १२ नमुने दूषित पाणी पुरवठ्याचे आढळून आले. हे दूषित स्त्रोत शुद्ध करण्यात आले आहेत. तसेच यापुढील कालावधीत उर्वरित पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली आहे.

पण्यामधील जीवजंतू, जिवाणू, परजीवी पेशी, कृमी यांच्या अस्तित्वामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण तपासण्यासाठी पाणी स्त्रोत मधील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जैविक तपासणी करण्यात आली. पाण्याच्या जैविक तपासणीमुळे मानवी आरोग्यास अपाय करणाऱ्या कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कर्करोग, यकृत, आतडे व त्वचेच्या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे सुलभ होते.

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत २ फेब्रुवारी पर्यंत १ हजार ८७ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामधील १२ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. जैविक तपासणीत दूषित आलेल्या पाणी स्त्रोत टीसीएल पावडरच्या सहाय्याने शुद्ध करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने दिली आहे. तर उर्वरित पाणी स्त्रोतांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सर्व जिल्हा परिषद सदस्य लक्ष ठेऊन आहेत.

जैविक तपासणीनंतर पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी
पाण्याच्या या नमुन्यांची केवळ जैविक तपासणी झाली करण्यात आली असून, सर्व पाणी स्त्रोतांची जैविक तपासणी पूर्ण झाल्यानंतर, पुढील काळात रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये फ्लोराईड, क्लोराईड, नायट्रेट, मँगनीज, सल्फेट, कॅल्शियम, सेलेनियम,आर्सेनिक, शिसे, सायनाईड, जस्त, क्रोमियम, पॉलिन्युक्लियर, ऍरोमॅटिक, हायड्रोकार्बन, या घातक रासायनिक घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version