राख्यांनी सजल्या बाजारपेठा; मणी असलेल्या राखीला महिलांची पसंती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
भावा-बहिणीचे अतूट नाते असणारा रक्षाबंधन सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला वेग आला आहे. गोंडा, सुरेख कलाकुसर, पारंपरिक, कार्टुनच्या राख्यांना विशेष मागणी आहे. तसेच यंदा मणी असलेल्या राख्या खरेदी करण्याकडे महिलांचा अधिक कल असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, लहान मुलांसाठी पुष्पा चित्रपटातील कलाकारांचे चित्र असलेली आणि लाईटवाली घड्याळाच्या राख्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, या राखीसोबत पेन्सिल मोफत देऊन शैक्षणिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 25 टक्के खरेदी झाली आहे.
रंगीबेरंगी राख्या महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीच्या नवनवीन राख्या यावेळी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. चार रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंतच्या राख्या जिल्ह्यातील विविध दुकानांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील बाजारपेठ राख्यांनी सजली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लटकन, कार्ड राखी, घड्याळाची लाईटवाली राखी, स्पायडरमॅन, छोटा भीम, युनिकॉन, मोटू पतलू, डोरे मॉलसह गोंडा स्पंच, स्टोन राखी, सिल्व्हर प्लेटेट अशा अनेक प्रकारच्या राख्या ग्राहकांच्या मागणीनुसार उपलब्ध आहेत.
मणी असलेल्या राखीला ग्राहकांकडून पसंती अधिक असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. ही राखी कुरिअर करण्यासदेखील सोपी असून, पाहण्यासदेखील आकर्षित आहे. त्यामुळे मणी असलेल्या राखीला मागणी अधिक आहे. तसेच बाजारात सध्या स्टोन, सिल्व्हर प्लेटेट राखीदेखील एक वेगळ्या आकारात उपलब्ध झाली आहे. मोर, गुलाब, स्वस्तिक चिन्ह असलेली राखीदेखील विक्रीसाठी बाजारात आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राख्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तेव्हापासून ग्राहकांकडून राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 25 टक्के राखीची खरेदी झाली असून, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. वाहतुकीचा खर्च, कच्च्या मालाचे वाढलेले दर अशा अनेक कारणांमुळे राखीच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेने यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.
पुष्पा, व्हॉट्सअॅप राखीचा क्रेझ
पुष्पा नावाचा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. या चित्रपटातील आलू अर्जुन या मुख्य कलाकाराच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. बाजारात आलु अर्जुन याचे चित्र असलेले पुष्पा राखीदेखील बाजारात दाखल झाली आहे. तसेच सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॅपला अधिक मागणी असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करणार्या नागरिकांची संख्यादेखील प्रचंड आहे. तरुणांसह वयस्कर मंडळींचादेखील यामध्ये मोठा सहभाग आहे. त्यामुळे बाजारात व्हॉट्सअॅपचा लोगो असलेली राखी उपलब्ध झाली आहे. राख्यांचा क्रेझ बाजारात वाढला आहे. बच्चे कंपनीने या राख्यांना अधिक पसंती दर्शविली असून, त्यांची किंमत 15 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आहे.
राखीतून शिक्षणाचा संदेश
बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्या खरेदीचा उत्साह बाजारात असलेल्या गर्दीनुसार दिसून येत आहे. बाजारात लाईटवाली घड्याळाची राखी दाखल झाली आहे. या राखीसोबत एक पेन्सील मोफत मिळत आहे. या राखीतून शिक्षणाचा संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे.
बाजारात गेल्या दहा दिवसांपासून राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येऊ लागला आहे. या आठ दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधन सणाला सुरुवात होण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहेत. त्याच्या चार दिवस अगोदर याहीपेक्षा राखी खरेदीसाठी गर्दी होणार आहे.
संदेश तुणतुणे, विक्रेते