शेकाप ‘इंडिया’ आघाडीत

I मुंबई I प्रतिनिधी I

विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीमध्ये आता शेतकरी कामगार पक्षाला सहभागी करून घेण्यात आले आहे. बुधवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली. शेकाप हा राज्यातील प्रागतिक आघाडीतील प्रमुख पक्ष असून त्याच्यासह बहुतेक पक्ष इंडियामध्ये सहभागी असल्याने राज्यातील भाजपविरोधी आघाडीची ताकद अनेक पटीने वाढणार आहे.

भाजपच्या विरोधातील इंडिया आघाडीची तिसरी बैठक या महिनाअखेरीस मुंबईत होणार आहे. तिच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. आज या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेकापला इंडिया आघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव मांडला व याला कोणाचा विरोध असेल असे मला वाटत नाही असे प्रतिपादन केले. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी या प्रस्तावाचे सहर्ष स्वागत केले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारण्याचा आग्रह धरला व यामुळे मुंबईत होणारी आगामी बैठक अधिक जोमाने पार पडेल असे मत व्यक्त केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये शेकापने डाव्या व पुरोगामी पक्षांची प्रागतिक आघाडी उभी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या आघाडीत तेरा पक्ष सहभागी आहेत. आपण या प्रागतिक आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आजच्या बैठकीला हजर आहोत असे भाई जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रागतिक आघाडीतील स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनाही या आघाडीत सहभागी करून घेतले जायला हवे अशी सूचना त्यांनी केली. त्याला इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे.

प्रागतिक आघाडीतील दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशन यांच्यासारखे पक्ष याआधीच इंडिया आघाडीत सहभागी आहेत. आता शेकापच्या सहभागामुळे महाराष्ट्रात इंडिया अधिक मजबूत होईल अशी भावना सर्वच नेत्यांनी बोलून दाखवली व शेकापचे जोरदार स्वागत केले. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एस.व्ही जाधव व कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे हेदेखील भाई जयंत पाटील यांच्यासमवेत आजच्या बैठकीला हजर होते.

प्रागतिक पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले) – लिबरेशन, जनता दल (सेक्युलर), लाल निशाण पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर), श्रमिक मुक्ती दल, बहुजन विकास आघाडी या पक्षांचा समावेश आहे

Exit mobile version