शेकाप नेते भाई रामदास जराते कार्यकर्त्यांसह स्वतः ला अटक करवून घेणार

राज्यपालांना भेटून निवेदन देण्यासाठी वेळ व पासेस नाकारल्याच्या करणार निषेध

गडचिरोली | प्रतिनिधी |

महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी हे दि.११ व १२ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यातील बळजबरी खोदल्या जाणाऱ्या खदनींबाबत निवेदन देण्यासाठी वेळ व पासेस मागूनही त्या प्रशासनाने ‘खदानविरोधी’ आवाज दडपून टाकण्याच्या उद्देशाने न दिल्याने त्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाचे नेते, राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः ला गडचिरोली पोलिस ठाण्यात अटक करवून घेणार आहेत.
भाई रामदास जराते यांनी राज्यपालांच्या सचिवालयाला याबाबत इ मेल द्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील बळजबरी प्रस्तावित आणि सुरु करण्यात येत असलेल्या एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड इलाख्यातील बांडे, सुरजागड, दमकोंडवाही तसेच कोरची तालुक्यातील आगरी, मसेली,सोहले,झेंडेंपार सह २५ लोह खदानी रद्द करण्यात याव्यात यासाठी स्थानिक आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून आंदोलन, मोर्चा तसेच निवेदन, ठराव, पत्र लिहून पाठपुरावा करण्यात येत आहे.मात्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. शेतकरी कामगार पक्षाने स्थानिकांच्या ‘खदानविरोधी’ भुमिकेला समर्थन देवून सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
महामहीम राज्यपाल हे आदिवासी जनतेचे घटनात्मक पालक असल्याने स्थानिक आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या’खदानविरोधी’ भुमिका लक्षात आणून देवून मंजूर आणि प्रास्तावित लोह खाणी ताबडतोब रद्द करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे वतीने भेटून निवेदन देण्यासाठी तीन दिवसांपासून भेटीची वेळ व पासेस मिळण्याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेकडे पत्र देऊन विनंती करण्यात आली. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ व पासेस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
सदरचा प्रकार हा लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा असून आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या ‘खदानविरोधी’ भूमिकेला एकतर्फी नाकारुन पेसा, वनाधिकार कायद्यासह विविध कायदे धाब्यावर बसवून स्थानिक आदिवासी आणि ग्रामसभा यांच्यावर विनाशकारी लोह अयस्क खदान लादणारा आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या या प्रकाराचा निषेध म्हणून दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते गडचिरोली पोलिस ठाण्यात स्वतःला बेमुदत काळासाठी अटक करवून घेणार आहेत.

Exit mobile version