सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची करामत, पूरग्रस्तांची मदत अंगणवाडी सेविकांना दिली गिफ्ट- शेकाप चिटणीस रमेश मोरे

पूरग्रस्तांची मदत अंगणवाड्याना
माणगाव | प्रतिनिधी |
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांनी पूरग्रस्तांना आलेली मदत माणगावमधील अंगणवाड्याना वाटून एक करामत केली असून या गोष्टीचा शेकापतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. अशी जोरदार टीका माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानवर केली.या पत्रकार परिषदेत शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे, मोर्बा माजी सरपंच दिनेश गुगळे, सुरवचे माजी सरपंच बळीराम खडतर,निनाद मोरे,योगेश मोरे आदी उपस्थित होते.
माणगाव तालुक्यातील 335 अंगणवाड्याना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी कुणबी भवन माणगाव येथे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.या कार्यक्रमानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी व वाटप करण्यात आलेले किट तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी ताब्यात घेऊन रविवारी.3 ऑक्टोबर रोजी आपल्या माणगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या घटनेचा पर्दाफाश केला.
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने अंगणवाड्याना वाटप केलेल्या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान पूरग्रस्तांसाठी मदत असे लेबल लावलेला पुरावाच सादर करुन प्रतिष्ठानवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार झोड उठविली.


पत्रकार परिषदेत बोलताना रमेश मोरे पुढे म्हणाले संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यात दि.22 व 23 जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन आपले शेजारील तालुके महाड व पोलादपूर याठिकाणी महापूर येऊन तेथील लोकांचे आतोनात हाल झाले होते.अनेक संसारे उध्वस्त झाली.या पूरग्रस्तांना विविध पक्षांमार्फत तसेच संस्था,संघटनांकडून व दानशूर व्यक्तींकडून मदत येत होती.त्यावेळी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने आलेली ही मदत अर्धवट वाटून अनेक अन्नधान्याचे किट व साहित्य यांनी गोडावून भरून ठेवले. ही गोडावून आता उघडून तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षवाढीसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.राज्य सरकारच्या महाविकास आघाडीतील शेकाप हा जरी एक घटक पक्ष असला तरी कोणी पक्ष चुकीच्या पद्धतीने वागत असेल ते शेकाप कधीच खपवून घेणार नाही,असा इशाराही मोरे यांनी दिला.

माणगावात पूरग्रस्तांसाठी आलेली मदत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने साहित्याच्या रूपाने अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुपूर्द करून त्यांचा ही एकप्रकारे अवमान केला. या साहित्याचे वाटप पालकमंत्री यांनी केले असून पूरग्रस्तांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याने त्यांनी पालकमंत्री पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा याबाबत आपण मुख्यमंत्री व राज्यपाल यांचीही लवकरच भेट घेणार आहोत.
रमेश मोरे,तालुका चिटणीस

Exit mobile version