सर्पमित्रांकडून अजगराची सुटका

| चिरनेर | प्रतिनिधी |

चिरनेर येथील रहिवासी गजानन काळू वशेणीकर यांच्या शेतात कंपाऊंडसाठी लावलेल्या जाळ्यात रविवारी (दि.11) सकाळी 9 फुटी लांबीचा इंडियन पायथॉन जातीच्या अजगर अडकून पडला होता. सर्पमित्र राजेश पाटील यांनी जाळी कापून शिताफीने पकडून सुटका केली. गजानन वशेणीकर शेतावर फेरफटका मारायला गेले होते. त्यांना शेतातील कंपाऊंडसाठी लावलेल्या जाळ्यात अजगर अडकला असल्याचे आढळून आले. सुटकेसाठी अजगराची धडपड सुरू असल्याचे पाहून गजानन वशेणीकर यांनी या घटनेची माहिती सर्पमित्राला दिली. माहिती मिळताच लागलीच सर्पमित्र राजेश पाटील यांनी शेतावर धाव घेतली. त्यांना 9 फुटी लांबीचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर शेतातील कंपाऊंडसाठी लावलेल्या जाळ्यात अडकला असल्याचे आढळून आले. जाळीतुन सुटकेसाठी धडपड करीत असलेल्या अजगराची सर्पमित्र राजेश पाटील यांनी चाकू, कैचीने जाळी कापून इजा होणार नाही, याची दक्षता घेऊन शिताफीने पकडून सुटका केली. त्यानंतर त्याला बापुजी देवालयाच्या जंगलातील नैसर्गिक वातावरणात सोडून दिले.

Exit mobile version