पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र

टेबल टेनिस संघाने इतिहास रचला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने सोमवारी इतिहास रचला. दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली. आता हे दोन्ही संघ पॅरिस ऑलिंपिकमधील सांघिक विभागात पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. 2008 पासून ऑलिंपिकमध्ये एकेरीसह सांघिक विभागासाठीही स्पर्धा घेतल्या जात आहेत. पण 2008, 2012, 2016 व 2021 या ऑलिंपिकमध्ये भारताच्या एकाही संघाला पात्रता मिळवता आली नव्हती. यंदा मात्र जागतिक क्रमवारीच्या जोरावर भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक केले.

बुसान येथे मागील महिन्यात जागतिक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॅरिस ऑलिंपिकसाठी ही अखेरची पात्रता फेरी होती. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला होता. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेकडून सोमवारी पात्र ठरलेल्या देशांबाबत माहिती देण्यात आली आहे. क्रमवारीनुसार ही निवड करण्यात आली आहे. भारताच्या दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताचा पुरुषांचा संघ 15 व्या स्थानावर आहे. भारतासह पुरुष विभागात क्रोएशिया (12 वे स्थान), स्लोवेनिया (11 वे स्थान) या देशांनीही पात्रता मिळवली आहे. भारतीय महिला संघ 13 व्या स्थानावर असून या विभागात भारतासह पोलंड (12 वे स्थान), स्वीडन (15 वे स्थान) व थायलंड या देशांना पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवता आला आहे.2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस या खेळातील सांघिक विभागातील स्पर्धांना सुरुवात झाली. तिथपासून 2012 लंडन, 2016 रिओ दी जेनेरियो व 2020 टोकियो अशा एकूण चार ऑलिंपिक पार पडल्या. पण भारताच्या पुरुष व महिला यापैकी कुणालाही सांघिक विभागात पात्र ठरता आले नाही.

भारताच्या दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवल्यानंतर भारताचा अनुभवी पुरुष खेळाडू शरथ कमल याने आनंद व्यक्त केला. तसेच ट्विटर या सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, अखेर ऑलिंपिकमध्ये सांघिक विभागासाठी पात्र ठरलो. पाचव्या प्रयत्नात आम्हाला यश मिळाले. त्यामुळे साहजिकच आनंद मोठा आहे. याची प्रतीक्षा बराच काळ करीत होतो. त्यामुळे स्पेशल भावना मनामध्ये निर्माण झाल्या आहेत. महिला संघानेही पात्र ठरून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Exit mobile version