पर्यटकांसाठी दिवसातून दोन फेर्या
| नेरळ | प्रतिनिधी |
मे 2019 मध्ये माथेरान येथून नेरळकडे येत असताना प्रवासी गाडीला अमन लॉजजवळ अपघात झाल्याने नेरळ-माथेरान-नेरळ या नरोगेज मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये या मिनीट्रेनच्या मार्गाची दुरवस्था झाली होती. दरम्यान, आता तब्बल सव्वा तीन वर्षांनी मिनीट्रेन पुन्हा एकदा नरोगेज मार्गावर आली आहे. माथेरानचे पर्यटन आणि दिवाळी सण या पार्श्वभूमीवर मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याने माथेरानचा पर्यटन हंगाम चांगला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
नेरळ-माथेरान-नेरळदरम्यान पहिल्या प्रवासी गाडीसाठी सहा प्रवासी डब्बे लावण्यात आले होते. त्यातील द्वितीय श्रेणीचे तीन डब्बे तसेच विस्टा डोम हा 16 प्रवासी क्षमता असलेला वातानुकुलित डब्बा आणि कुपे असे सर्व प्रवासी डब्बे फुल्ल होते. त्यातील द्वितीय श्रेणीमधून 90 तर विस्टा डोममधील 16 प्रवासी यांनी प्रत्येकी 650 रुपयांची तिकीट खरेदी केली. पहिल्या कुपे फॅमिली डब्यातून पाच प्रवाशांनी 1525 रुपयांची तिकिटे काढून प्रवास केला.
पहिल्या गाडीसाठी एनडीएम 403 हे इंजिन लावण्यात आले होते, तर त्या इंजिनाची जबाबदारी के.टी. मतसार आणी सहाय्यक म्हणून मोमीन मुश्ताक आणि गार्ड म्हणून हरीचांद्र आहिरवार यांनी पार पाडली. तिकीट तपासनीस सेल्वा कुमार म्हणून ट्रॅफिक इन्स्पेटर सुबोध कुळकर्णी, ता बुकिंग क्लार्क संतोष जामघरे, रोहिदास लाँगले आणि विनोद मेनन यांनी काम पाहिले. यावेळी नेरळ स्थानक प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी सहायक प्रबंधक मोहित तांडेल, अंकित गुप्ता, वरिष्ठ अभियंता सुशांत सोनवणे, सुरक्षा दलाचे भावेश आदी गडीसोबत नेरळ स्टेशन येथे होते.
20 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरान अशी गाडीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ अशी थेट प्रवासी वाहतूक आज 22 ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावर आली आहे. तब्बल सव्वा तीन वर्षांनी नेरळ येथून मिनीट्रेन सुरु होत असल्याने नेरळ येथील लोको कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी आणि अभियंते यांच्यात मोठा उत्साह होता. प्रवासी ट्रेनचा प्रवास पर्यटन हंगाम पूर्ण होईपर्यंत सुखरुप होण्यासाठी इंजिन यांची पूजाअर्चा करण्यात आली. तर सर्व गाडीला फुलांनी सजविण्यात आले होते. सव्वा तीन वर्षांनी रुळावर आलेल्या मिनी ट्रेनच्या पहिल्या प्रवासी गाडीसाठी एनडीएम 403 इंजिन लावण्यात आले होते. तर पहिल्या गाडीचे पहिले तिकीट फिरोज अहमद या पर्यटक प्रवाशाने घेतले.
दररोज दहा गाड्या सुरू ठेवा
सध्या प्रवासी आणि पर्यटकांच्या सेवेसाठी नेरळ-माथेरान मार्गावरील अमन लॉज-माथेरान या दरम्यान शटल सेवा सुरू आहे. परंतु ही नेरळ-माथेरान- नेरळ ही मिनिट्रेन सेवा सुरू होताच येथील अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या फेर्या कमी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. किमान शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी तसेच दिवाळी पर्यटन हंगामात शटल सेवा पूर्ण प्रमाणात दररोज 10 गाड्या चालू राहाव्यात, अशी मागणी माथेरानकर पर्यटन हंगाम लक्षात घेऊन करीत आहे.
भाग्यवान प्रवासी
मुंबई सेंट्रल येथील फिरोज अहमद हे सकाळी साडे सहा वाजता रांगेत उभे होते आणि त्यांनी आपल्या 11 जणांच्या कुटुंबासह पहिले तिकीट मिळवीत प्रवास सुरू केला.
विस्टा डोममधील भाग्यवान प्रवासी
650 रुपये तिकीट असलेल्या नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनमधून प्रवास करण्यासाठी मुंबई येथील अभिषेक सिंह यांनी पहिले तिकीट मिळविले.