माथेरानच्या राणीला पर्यटकांची पसंती

पर्यटकांची नेरळ रेल्वे स्थानकात मोठी गर्दी

| नेरळ | वार्ताहर |

माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची रविवारी सायंकाळी नेरळ रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. माथेरान मिनी ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी खर्‍या अर्थाने ही गर्दी उसळली होती. माथेरान हे एक जागतिक दर्जाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ असून, येथे येणार्‍या पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील टॉय ट्रेन अर्थात मिनी ट्रेन आहे. घाट माथ्यावर वसलेल्या माथेरान येथे जाण्यासाठी सह्याद्रीच्या दरी खोर्‍यातून नागमोडी वळण घेत प्रवासी मिनी ट्रेन धावते. याच मिनी ट्रेनचा आनंद आपल्या परिवारासोबत एकत्र घेता यावा म्हणून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झालेत. त्यातूनच विकेंडचा बेत आखून पर्यटक घराबाहेर पर्यटनस्थळ पाहण्यासाठी फिरताना दिसतो. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. पुणे, मुंबईच्या हाकेच्या अंतरावर हे ठिकाण असून, पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. सध्या माथेरानचा मान्सून हंगाम सुरू होणार आहे. पर्यटकांची पावले माथेरान दिशेने वळताना दिसत आहेत. दरम्यान, रविवारी विकेंड सुट्टी असल्याने पुणे, मुंबई येथून आलेल्या पर्यटकांची गर्दी माथेरान जाण्यासाठी म्हणून नेरळ रेल्वे स्थानकात दिसून आली. आपल्या कुटुंबासोबत माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी माथेरानसोबत माथेरानच्या राणीचा अर्थात मिनी ट्रेनचा आनंद घेण्यासाठी नेरळ-माथेरान-नेरळ धावणार्‍या ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी नेरळ स्थानकात गर्दी केली होती.

एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे नागरिक माथेरान येथेही उन्हात पावसाचा आनंद घेतो, तर पावसाळ्यात उन्हाचा आनंद असा एकाच ऋतूत दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव पर्यटकांना अनुभवाला मिळत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण निर्माण झाल्याने पर्यटकांनी या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी माथेरानच्या दिशेने आपली पावले उचलल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहेत. माथेरान घाटातील निसर्ग दृश्य पाहण्यासाठीदेखील पर्यटक खासगी वाहनाने सकाळ-दुपार तर सायंकाळी फिरण्यासाठी घाटात गर्दी करीत आहेत.

तिकीट मिळवण्यासाठी धडपड
सकाळी सहा वाजल्यापासून ही गर्दी स्थानकात दिसून येत होती. काहींना तासन्तास रांगेत उभे राहून मिनी ट्रेनचे तिकीट मिळाल्याने ते खुश होते, तर काहींना रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्याने त्यांचा आनंदाचा हिरमोड झाला होता. परंतु, माथेरान थंड हवा अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी थेट पर्यायी साधनांचा वापर करीत माथेरान गाठले होते. त्यामुळे माथेरान शहर पर्यटकांनी गजबजून गेले होते. शनिवार- रविवार अशा दोन दिवसांची ऑफिस सुट्टी असल्याने विकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक माथेरानच्या दिशेने प्रामुख्याने वळताना दिसले.
Exit mobile version