माथेरानची राणी हेरिटेजसाठी सज्ज

युनेस्कोने मागविली माहिती
माथेरान । मुकुंद रांजाणे |
माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज ‘माथेरानची राणी’, म्हणजेच मिनीट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे. याबाबत नुकतीच रेल्वेच्या अधिकार्‍यांनी माथेरानला भेट दिली असून, यात काही माथेरानचा सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती मध्य रेल्वेला हवी असल्याने माथेरान नगरपालिकेत अर्ज दाखल केला आहे.
1901 मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वतःचे 16 लाख रुपये खर्चून ही रेल्वे बनविण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभाय यांनी 1907 मध्ये या रेल्वेचे काम पूर्ण केले आणि ही मिनीट्रेन जोमाने सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर ही मिनीट्रेन भारत सरकारच्या अखत्यारित आली. त्यावेळी वाफेच्या इंजिनवर ही मिनीट्रेन धावत होती. 1983 मध्ये वाफेचे इंजिन बंद करून डिझेलवर धावणारी इंजिन वापरली जाऊ लागली. 114 वर्षे उलटूनही ही मिनीट्रेन आजही डौलात धावत आहे. 2002 च्या दरम्यान ही मिनीट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. याबाबत युनेस्कोच्या टीमसुद्धा माथेरानमध्ये येऊन गेली.
मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे भारतीय रेल्वे आणि माथेरानकरांचे स्वप्न भंगले. मात्र, आता पुन्हा मध्य रेल्वेने युनेस्कोकडे अर्ज दाखल केला आहे व युनेस्कोकडून या अर्जाचा स्वीकार करण्यात आला असून, याबाबत उपमुख्य पर्यावरण एवं गृहव्यवस्था प्रबंधक शिवाजी कदम यांनी माथेरान नगरपालिकेस पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये माथेरानमधील सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मागविण्यात आली आहे. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर सुशील सोनावणे तसेच रेल्वे कामगार सेनाचे सचिव दगडू आव्हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, युनेस्कोने माथेरान मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा दिला, तर भारतीय रेल्वे यांना मोठी रक्कम असलेल बक्षीस मिळेल. तर, या हेरिटेज दर्जामुळे माथेरानच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाईल.

वारसाबाबत हवी असलेली माहिती

Exit mobile version