विभागीय क्रीडा संकुल उभारणीवर प्रश्‍नचिन्ह

उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचे कोकणातील तरुणांचे स्वप्न अपूर्णच

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणातील तरुण-तरुणींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करता यावी व कोकण विभागातील जास्तीत जास्त उत्कृष्ट खेळाडू या मातीतून घडावेत यासाठी राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी मंजुरी देऊन हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, या क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर अद्याप धावपट्टी तर सोडाच, साधी वीटदेखील रचली गेली नाही. त्यामुळे या विभागीय क्रीडा संकुल उभारणीवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचे कोकणातील तरुणांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. याबाबत कोकणातील खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे.

माणगाव या ठिकाणी सर्व सोयीनियुक्त प्रशस्त जागेत सुमारे दहा हेक्टर जागेवर कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारले जाणार असून, हे क्रीडा संकुल ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणच्या जागेची पाहणी माजी क्रीडा राज्यमंत्री, आदिती तटकरे यांनी 3 फेब्रु. 2020 रोजी केली होती. या पाहणीला तब्बल तीन वर्षे लोटली, मात्र अद्यापही या जागेवर शासनाने कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारणीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे कोकण विभागातील तरुण खेळाडूंपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून, हे संकुल तीन वर्षांनंतरही कागदावरच राहिले आहे. यामुळे माणगावात होणार्‍या कोकण विभागीय क्रीडा संकुल सुमारे 45 कोटींच्या भव्य क्रीडांगणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विभागीय क्रीडा संकुल उभारणीचे पुढचे पाऊल कधी, असा सवाल कोकणातील खेळाडूतून बोलताना व्यक्त होत आहे.

माणगाव जवळील नाणोरे हद्दीतील गट नं. 130 मधील शासनाची ही जागा विभागीय क्रीडा संकुलाच्या नावे सातबारा उतार्‍यावर करण्यात आली आहे. कोकण विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांसाठी माणगाव येथे 25 एकर जागेवर भव्य सर्व सोयीनियुक्त असे विभागीय क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. माणगाव हे शहर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने व कोकणातील सात जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने कोकण विभागातील सर्व खेळाडूंसाठी सोयीचे ठिकाण आहे. या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांसाठी उत्तम प्रशिक्षण सुविधा आणि निवासी व्यवस्थासुद्धा उभारण्यात येणार असल्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे कोकण विभागातील सर्व खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण आणि खेळांची तयारी करण्याची संधी या संकुलात मिळणार आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू तयार होऊन देशाचे नाव उंचावणार आहे.

विभागीय क्रीडा संकुलात याचा समावेश असणार
या क्रीडा संकुलामध्ये 400 मीटर सिंथेटिक धावनपथ, फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिंग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रूम, आऊटडोअर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेनवॉटर हार्वेस्टिंग त्याचप्रमाणे बोअरवेल, फिल्टरेशन प्लँन्ट, जलतरण व डायव्हिंग तलाव सुविधांचा समावेश आहे.

विभागीय क्रीडा संकुलात कोकणातील सात जिल्ह्यांतील क्रीडाप्रेमींना करिअर घडवता येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह सातही जिल्ह्यांतील ग्रामीण, शहरी, तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील खेळाडूंना विभाग स्तरावर प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली होती.

पंकज तांबे
जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस
Exit mobile version