प्लास्टिक बंदीवर प्रश्‍नचिन्ह

। पेण । वार्ताहर ।
पेण शहरातील पावसाळी गटारे आणि नालेसफाईची कामे जोरात सुरु आहेत. या नाल्यांमध्ये माती आणि इतर टाकाऊ वस्तू आढळून येत आहेत. मात्र शहरातील मुख्य नाल्यातून मच्छी मार्केटमधील गटारांमध्ये चक्क प्लास्टिकच्या पिशव्या, बिअर व दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले. त्यामुळे प्लास्टिकबंदी राबवूनही कोणताही लाभ होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाप्रलयास प्लास्टिकही कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते नाल्यात जाऊन अडकते. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांच्या पात्रात पिशव्या साचल्याने पावसाचे पाणी तुंबून ते रस्त्यावर व घरात शिरण्याचे प्रकार घडत आहेत. 23 जून 2018 पासून राज्यात प्लास्टिकबंदी आदेश लागू झाले. मात्र त्यानंतरही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरुच आहे. मोकळे भूखंड, रस्त्ये, कचराकुंड्या आणि गटारात प्लास्टिक निदर्शनास येत आहे.


स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पेण नगरपालिका मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत आहेत. मधल्या काळामध्ये प्लास्टिक बंदीची सक्ती करून अनेक व्यापार्‍यांवर व फळ, भाजी विक्रेत्यांवर दडांत्मक कारवाई केली गेली. तसेच कित्येकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या गेल्या. आजच्या स्थितीला पेण शहरातून हजारो किलो माती, वाळू या सोबत प्लास्टिक, थर्माकोल मोठ्या प्रमाणात गटार सफाई मधून काढण्यात आले. तसेच या कचर्‍याच्या ठिकाणी गाय, बैल, प्लास्टिक पिशव्या रवंथ करताना दिसतात. या प्लास्टिकमुळे या जनावरांना देखील अपाय होतो. प्लास्टिक बंदी असताना देखील आता पेण शहरामध्ये सर्रास भाजी विक्रेते फळ विक्रेते तसेच व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसतात. तसेच नगरपालिकेचे काही कर्मचारी प्लास्टिक विक्रेत्या दुकानदारांकडून लक्ष्मी दर्शनाची अपेक्षा ठेवत असल्याने सर्रास प्लास्टिकचा वापर पेण शहरामध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. एकिकडे स्वच्छ भारत अभियानामध्ये नगरपालिका पुरस्कार मिळण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र काही कर्मचार्‍यांच्या चुकीमुळेच प्लास्टिक बंदीवर शिथिलता होऊन पेण शहरात प्लास्टिकचा सुळसुळाट दिसत आहे.

पेण शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदी आहे. मात्र, काही दुकानदार लपून छपून प्लास्टिकचा वापर करत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तर केली जाईलच वेळ आल्यास त्यांचा दुकान परवाना रद्द करण्याची देखील कारवाई केली जाईल.

महेश वडके, प्लास्टिक बंदी विभाग प्रमुख, नगरपालिका

मुख्य नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल यामध्ये अडकून पडल्यास गटारे चॉकप होउन आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. तसेच बर्‍याच वेळेला नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असते. म्हणून नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये.

शिवाजी चव्हाण, पेण.न.पा.आरोग्य प्रमुख
Exit mobile version