पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यासाठी शिष्टमंडळाचे साकडे
| रसायनी | वार्ताहर |
जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील नवीन शेवा गाव हा बोकरविडा येथे स्थलांतरित करण्यात आला होता. पण गेली 37 वर्ष त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यासंबंधी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील व उपाध्यक्ष एल जी म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार सचिन अहिर यांची भेट घेऊन हा प्रश्न चालू अधिवेशनात मांडण्यास विनंती केली आहे.
पुनर्वसित नवीन शेवा गावाचा पुनर्वसन 1987 साली बोकडविरा येथील सर्व्हे नं. 112 मध्ये एकूण क्षेत्रफळ 33.64 हेक्टर जमिनीमध्ये झालेला असताना सिडकोकडून फक्त 10 हेक्टर मध्ये नवीन शेवा गावाचा पुनर्वसन करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषण केलेली आहेत. परंतु, कित्येकवेळा ग्रामस्थांना आश्वासनाची खैरात देऊन पुनर्वसित नवीन शेवा ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे.
नवीन शेवा ग्रामपंचायतीने अनेक वेळा जे.एन.पी.टी., सिडको, जिल्हाधिकारी रायगड व तहसिलदार उरण यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही जागेचा ताबा मिळालेला नाही, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता. त्याही वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा असा विनंती अर्ज समितीच्या आध्यक्षानी आदेश पारित केले होते. तरी सुध्दा सिडकोने त्या आदेशाचा पालन न करता केराची टोपली दाखविली आहे, यावे मुळे पुनर्वशीत नवीन शेवा गावातील ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र होत चालल्या आहेत, आणि म्हणूनच आज नवीन शेवा गावच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार सचिन अहिर यांची भेट घेऊन हा प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात उचलावा अशी विनंती केली आहे. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली.
यावेळी नवीन शेवा गावच्या सरपंच सोनल घरत, उपसरपंच रेखा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रणीता भोईर वैशाली म्हात्रे, पंडित घरत, भगवान घरत शिवसेनेचे निलेश घरत, अशोक म्हात्रे, निलेश घरत, अमित भोईर, सागर घरत, शेकापचे महेश म्हात्रे, काँग्रेसचे श्रेयश घरत, मनसेचे हेमंत म्हात्रे, राष्ट्रवादीचे देवराम घरत व सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.