। रोहा । प्रतिनिधी ।
राज्यात शिवसेनेच्या गोटात चालू असलेल्या राजकीय हालचालींमुळे तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मात्र कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार अनंत गीते, जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्यासह काही पदाधिकार्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले असल्याची माहिती मिळत आहे.पण पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र मनातून जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत.
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेल्या सरकारचा जिल्ह्यातील आमदारांना फायदा झालेला नाही.जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून सुरुवात झालेली सेनेच्या विद्यमान आमदारांची नाराजी त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या थेट कानावर घातली होती.सेना आमदारांच्या मतदारसंघातील जलजीवन मिशनच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गावागावात केलेल्या थेट पत्रव्यवहारानंतर ही नाराजी अधिक प्रकर्षाने दिसून आली होती.
जिल्ह्यातील आमदारांनी आपली नाराजी मागील अडीच वर्षात वारंवार दाखवून देऊन देखील सेनेच्या आमदारांना सबुरीने घेण्याच्या सल्ल्याशिवाय हाती काहीच आले नव्हते. यामुळेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शिंदे गटाची साथ केली आहे. रोहा शहरात मात्र एका माजी शहर प्रमुखाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावलेला फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.याबाबत तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. मुंबई गोवा महामार्गावर मात्र काही ठिकाणी शिंदे गटाला समर्थन असल्याचे बॅनर झळकले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.