उरणमध्ये गॅससाठी पहाटेपासून रांगा

| उरण | प्रतिनिधी |

जगभरातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट उरण तालुक्याला बसू लागला असून, गॅस सिलेंडर टंचाईने नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा लागत आहेत, तर व्यावसायिक सिलेंडर मिळेनासे झाल्याने हॉटेल व्यवसाय अक्षरशः बंद होण्याच्या मार्गावर आहे.

उरणमध्ये सध्या घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटे 4 वाजल्यापासून गॅस कार्यालयासमोर रांगा लावाव्या लागत आहेत. कामधंदा बाजूला ठेवून लोक सिलेंडरसाठी ताटकळत उभे राहत आहेत. आज तर सिलेंडरची गाडी सकाळी 9 वाजता आल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि सिलेंडर घेण्यासाठी हाणामारी होण्याची वेळ आली. घरगुती सिलेंडर ओटीपी आल्यानंतर मिळत असला तरी व्यावसायिक सिलेंडरचा तुडवडा अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे उरणमधील हॉटेल व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले सिलेंडरच उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल चालक हतबल झाले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर उरणमधील अनेक हॉटेल व्यवसाय बंद पडण्याची वेळ येईल, असा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे. दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उरणमधील हॉटेल व्यावसायिकांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदारांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. यावर लवकरच योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. गॅस टंचाईचा हा भडका पाहता उरणमध्ये गॅस आहे कुठे? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांकडून जोरात विचारला जात आहे.

Exit mobile version