जेनपीटीकडे जाणार्‍या वाहनांच्या रांगा ; प्रवासी वाहतुकीवरही परिणाम

। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए बंदरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने जेनपीटी बंदराकडे जाणार्‍या मार्गावरील करळ उड्डाणपूल ते धुतूमपर्यंत जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या कंटेनर वाहनाच्या रांगा मंगळवारी लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलकडे जाणारी प्रवासी वाहनेही या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागला.
जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक वाढली आहे. त्यामुळे वाढत्या कंटेनर वाहनांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)कडून सहा पदरी मार्ग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये करळ येथे बहुमार्ग उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या उड्डाणपुलावरून ये-जा करण्यासाठी सहापदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, जेएनपीए बंदरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने मंगळवारी वाहतुकीवर परिणाम झाला. दररोज वाढणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे जेएनपीए बंदराकडे जाणार्‍या तिन्ही मार्गावर कोंडी झाली. त्यामुळे उरणवरून करळ, सोनारी व सावरखार या गावातील नागरिक व प्रवाशांना घेऊन जाणार्‍या वाहनांही याच कोंडीमध्ये अडकावे लागत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जेएनपीएसाठी सहापदरी रस्ते तयार करून ते सुरू करण्यात आले असतानाही कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने अनेक प्रवासी हे विरुद्ध दिशेने प्रवास करीत आहेत. त्यामुळे करळ उड्डाणपुलावर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version