पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा

टँकरचालकांचा संप सुरू; इंधन तुटवडयाची भीती

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास सहा वर्षांच्या शिक्षेची आणि सात लाख दंडाची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात या कायद्याला विरोध होत असून टँकरचालकांनी थेट 1 ते 3 जानेवारीपर्यंत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पेट्रोल तुटवड्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहधारकांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी रांगा रस्त्यावर आल्या आहेत.

केंद्र शासनाने हा नवीन कायदा रद्द करावा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणार्‍या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. ज्यात 3 जानेवारीपर्यंत टँकरचालक संपावर गेले आहेत. तीन दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या कालपासून माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरातील चारही पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा होत्या. जिल्ह्यात तिच परिस्थिती आहेत. याबाबत पंप चालकांनी स्पष्ट केले आहे की, पंपचालकांचा संप नाही. त्यामुळे जोवर पंपात पेट्रोल, डिझेल आहे, तोवर पंप सुरू राहणार आहे. सरकारने या कायद्यात तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे. अन्यथा त्याचा परिणाम देशभर दिसून येईल, असा इशारा देखील ट्रकचालक संघटनांकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version