| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि.12) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या.
श्री बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिरा बाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.
भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंगवाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, छोटे मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दी यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून आले होते. तर काही लक्झरी किंवा खासगी बसेसने आले. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली






