ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके अडचणीत

| उरण । वार्ताहर ।
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ हवामानामुळे आता रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे. यामुळे भाजीपाला पिकाला फटक बसला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाल पिक घेतात; पण गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याचे त्याचा परिणाम पिकांवर झाला असून लागवड केलेले उडदाचे पीक, तुरीचे पीक हातून जायची वेळ आली आहे. यामुळे वालाची वाढ खुंटणार आहे.

रंब्बी हंगामात बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट भरून काढली जाते. या वर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली; मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने काही भागात भात पिक वाहून गेले, तर काही भागांत भात कुजण्याचे प्रकार समोर आला. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी भात शेतीची कामे लवकर उरकून भाजीपाल्याची लागवड केली. जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकर्‍यांनी भाजीपाल्याची लागवड केली. मात्र आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडले आहेत.

Exit mobile version