महायुतीत मिठाचा खडा

शरद पवार गटानेही काढला चिमटा

| अमरावती | प्रतिनिधी |

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेपूर्वीच अमरावतीमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. आमदार बच्चू कडू यांनी येथील सायन्सकोर मैदानात येऊन पोलिसांना जाब विचारला. कारण, पोलिसांकडून काढलेल्या परवानगीनुसार 24 तारखेला हे मैदान आमदार बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी ही परवानगी नाकारण्यात आली व तिथे गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आमदार कडू संतप्त झाले होते. आता, महायुतीतील राष्ट्रवादी गटही नवनीत राणा यांच्यावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन नवनीत राणांना इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी अमरावतीत सभा होत आहे. त्या सभेपूर्वीच आमदार मिटकरी संतापले आहेत.

अमित शाह यांनी मंगळवारी अकोल्यात सभा घेतली. त्यानंतर बुधवारी नवनीत राणा यांच्या सभेसाठी ते अमरावतीमध्ये दाखल होत आहेत. अमरावतीमध्ये गृहमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा पदाधिकारी व राणा दाम्पत्य कामाला लागले आहे. सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल फ्लेक्स लावण्यात आला आहे. मात्र, आता या डिजिटल फ्लेक्सवरुनच वाद रंगल्याचे दिसून येते. कारण,आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन येथील सभामंडपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी थेट नवनीत राणांना इशाराही दिला आहे. नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशा शब्दात अमोल मिटकरींनी राणा यांना इशारा दिला आहे.

मिटकरींचा हा व्हिडिओ रिट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही अमोल मिटकरींना चिमटा काढला आहे. असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल, अशी फिरकी मिटकरींची घेत प्रशांत जगताप यांनी मिटकरींना डिवचलं आहे. त्यामुळे, आता महायुतीच्या उमेदवारासाठी होत असलेल्या सभेत अजित पवारांचा फोटो झळकतो की नाही, हेच पाहावे लागेल.

Exit mobile version