मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या बाबत प्रसारमाध्यमांमधून बातम्या झळकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तळा नगरपंचायत प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम चिटकवले. ज्यामुळे रात्रीच्यावेळी या रेडीममुळे होणारा अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

तळा शहरातील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अनेक भागात उनाड गुरांचे बसण्याचे प्रमाण अधिक असल्याने रात्रीच्यावेळी वाहन चालक अथवा प्रवासी रस्त्यावरुन जात असताना अपघात होण्याचा धोका अधिक आहे. तसेच, काहीवेळा मोटरसायकलवाले पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटना घडू नयेत यासाठी उनाड गुरांच्या शिंगांना नगरपंचायतीच्या माध्यमातून रेडीयमच्या पट्ट्या चिकटविण्यात येत आहेत. अशा पट्ट्या अनेक गुरांच्या शिंगांना चिकटवल्याने रात्रीच्यावेळी मोटरसायकल स्वाराला व वाहन चालकाला या गुरांच्या शिंगांना चिकटवलेल्या पट्ट्या चमकताना दिसतात व त्यावेळी वाहनचालकांच्या लक्षात येते की येथे काहीतरी आहे.

Exit mobile version