इंग्लंडमध्ये रहाणेचा ‘अजिंक्य’ डंका

। लंडन । वृत्तसंस्था ।

अगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयने चारही संघांची घोषणा केली आहे. परंतु, या चारही संघामध्ये फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अशातच रहाणे सध्या इंग्लंडमध्ये लीसेस्टरशायर क्रिकेट खेळत असून चांगल्या फॉर्ममध्ये असून एकदिवसीय स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरविरुद्ध खेळताना त्याने लीसेस्टरशायरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि संघाला उपांत्य फेरीत पोहचवले आहे.

या सामन्यात हॅम्पशायरने प्रथम फलंदाजी करताना लीसेस्टरशायरला 291 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लीसेस्टरशायरने 30 धावांवर 3 गडी गमावले होते. पण त्यानंतर अजिंक्य रहाणेने पीटर हँड्सकॉम्बला साथीला घेत 128 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने लीसेस्टरशायरच्या विजयाचा पाया रचला. हँड्सकॉम्ब 53 चेंडूत 74 धावांची खेळी करून बाद झाला. तर, रहाणेने 86 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांची खेळी करत बाद झाला. या स्पर्धेतील रहाणेचे हे चौथे अर्धशतक होतेे. अखेरच्या षटकातील एक चेंडू बाकी असताना लीसेस्टरशायरने विजय निश्‍चित केला. कॉक्सने 45 धावा केल्या. तर, लियाम 60 धावांवर नाबाद राहिला.

Exit mobile version