| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या मार्फत ठेकेदारांनी जी कामे केली आहेत त्यांची बिले दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्जत तालुका ठेकेदार संघटनेच्यावतीने राहुल डाळिंबकर यांनी बुधवारी (दि.25) आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना संघटनेच्या 35 ठेकेदारांनी साखळी पद्धतीने पाठिंबा दिला आहे.
कर्जतमध्ये मागील काही वर्षांत ठेकेदारांनी केलेल्या कामांची 203.95 कोटीची बिले प्रलंबित आहेत. मागील दीड वर्षांत ठेकेदारांना एक रुपयाचेही बील मिळाले नाही. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक स्थिती खालावली आहे. बँकामधून घेतलेल्या कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत असून मटेरियल सप्लायर्स यांनी उधारीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात बिले मिळाली नाही तर कंत्राटदारांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. अद्याप बिले अदा झाली नाही म्हणून संघटनेचे अध्यक्ष राहूल डाळिंबकर यांनी बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून कर्जत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. यादरम्यान, कर्जत तालुका ठेकेदार संघटनेच्यावतीने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन दिले आहे. त्यात, आपण वैयक्तिक लक्ष घालून या मार्चमध्ये ठेकेदारांना जास्तीत जास्त रकमेची बिले मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.






