अदानी विरोधात आवाज उठवल्याने राहुल गांधींना लक्ष

काँग्रेस प्रदेश सचिव तथा रायगड प्रभारी श्रीरंग बरगे यांची आरोप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी यांच्या 20 हजार कोटींच्या घोटाळ्यावर गप्प आहेत, एरवी विरोधकांना लक्ष्य करण्याची संधी न सोडणारे मोदी अदानी यांना पाठिशी का घालत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. अदानी उद्योगसमुहात शेल कंपन्यांची 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीबाबत सरकारला धारेवर धरल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाईला वेग आला हे सत्य नाकारता येणार नाही, असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

आज काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या वरील कारवाई संदर्भात अलिबाग येथील बॅ.ए.आर.अंतुले भवन (काँग्रेस भवन) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्‍न विचारले. यामध्ये अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील 20 हजार कोटी रुपये कोणाचे? हा प्रश्‍न विचारला व त्याच प्रमाणे यामध्ये एक चिनी नागरिकाचाही सहभाग आहे, हा चिनी नागरिक कोण? याची उत्तरे प्रधान सेवकांनी द्यायला हवी होती. कर नाही तर डर कशाला मात्र भाजपकडून या मुद्याला बगल दिली जात आहे.

उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध सर्वश्रुत आहे. विमानतळ, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली आहे. त्याचे पुरावे आहेत. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौर्‍यात पंतप्रधान मोदींनी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला, याचे पुरावे राहुलजी गांधी यांनी कागदपत्रासह दिले. मल्लिकार्जून खर्गे यांनी संसदेत अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला, परंतु या दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला. हे कृत्य संसदीय लोकशाहीला मारक आहे.

या पत्रकार परिषदेला रायगड जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.पाटील, प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड.श्रद्धा ठाकूर, काँगेसचे प्रदेश प्रतिनिधी मार्तंड नाखवा, सुभाष पाखरे, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर चव्हाण, योगेश मगर, प्रभाकर राणे, श्रीकांत नाईक, अशोक मोकल यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version