शेतकर्‍यांना जीएसटीमुक्त करणार – राहुल गांधी

| नाशिक | प्रतिनिधी |

देशामध्ये शेतकर्‍यांची आस्था नसलेले सरकार सत्तेवर आहे. यामुळे शेतकर्‍यांवर विविध प्रकारचे कर लागू करण्यात आले आहेत. देशात परिवर्तन झाल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकर्‍यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्‍वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी (14) नाशिकमध्ये दिले.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे राहुल गांधी यांची एकात्मता यात्रा पोहोचली. त्यांच्या यात्रेचे चांदवड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर चांदवड येथील बाजार समितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी हे आश्‍वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. देशातील शेतकरी चहू बाजूनी समस्यांनी घेरला गेला आहे, त्यामुळे त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यास सर्वप्रथम कर्जमाफी त्यांना देण्यात येईल, मात्र केवळ कर्जमाफी घेऊन त्यांचे प्रश्‍न सुटणार नाही, तर त्यांना अन्य उपायदेखील करावे लागतील. पीक विमा देणार्‍या कंपन्या या शेतकर्‍यांसाठी असून, त्यांच्या भरपाईच्या निकषांचे फेर नियोजन करण्यात येईल आणि शेतकर्‍यांना संरक्षण कसे मिळतील याबाबत प्रयत्न केले जातील. शेतकर्‍यांना जीएसटी लागू करण्यात आला असून, उत्पादनांना त्यांना टॅक्स भरावा लागतो. हा करही काढून घेण्यात येईल आणि शेतकर्‍यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्‍यांना किमान हमीभाव दिला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले. देशातील जवान आणि किसान या दोघांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

शेतकरी विरोधातलं सरकार हटवूया!
शेतकर्‍यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं, कर्ज माफ करायचं, असा निर्णय आम्ही घेतला होता. 70 हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं. पण, आज काय स्थिती आहे. तिच स्थिती परत आहे. शेतकरी संकटात आहे, मात्र आजचे राज्यकर्ते त्यासाठी काही करत नाही. उद्योगपतींचं कर्ज माफ होतं, पण शेतकर्‍यांचं कर्ज माफ होत नाही. तेव्हा कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार हे सरकार हटवणं हे तुमचं आणि माझं काम आहे. त्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन संबंध जे करता येईल ते करूया, असा निर्धार शरद पवार यांनी केला. या देशातील जनतेला, तरुण पिढीचं एक जनमत तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी राहुल गांधी करत आहेत. त्यांना शक्ती देऊया, असे आवाहनही पवार यांनी केले.
मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा
2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, असे आश्‍वासन दिले होते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्‍वासने यवतमाळमध्ये दिली होती. पण, दहा वर्षांत ती पूर्ण केली नाहीत. मोदींनी शेतकर्‍यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही, असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकर्‍यांना फसवणार्‍या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते चांदवड येथे बोलत होते.
Exit mobile version