टी 20 क्रमवारीत राहुलची सहाव्या स्थानी घसरण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आयसीसीने टी20 रॅकिंग जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा करणार्‍या फलंदाजांना फायदा झाला आहे. मात्र, पहिल्या पाच खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलची आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे. तो सहाव्या स्थानावर गेला आहे तर विराट कोहली आठव्या स्थानावर कायम आहे. तर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा 15 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 839 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसर्‍या तर एडन मार्करम तिसर्‍या स्थानावर आहे. टी20 विश्‍वचषकात शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतक लगावणार्‍या राहुलचे 727 अंक आहेत. मात्र तो सहाव्या स्थानावर घसरला आहे. विश्‍वचषकानंतर टी 20 कर्णधारपद सोडणारा विराट कोहली 698 अंकांसह आठव्या स्थानावर आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये या दोघांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे चौथ्या स्थानावर तर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान पाचव्या स्थानावर आहे. रिझवानने विश्‍वचषकात 6 सामन्यात 70.25 च्या सरासरीने 281 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार आरोन फिंच चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे.

Exit mobile version