32 बारबालांसह 40 जणांविरोधांत गुन्हे दाखल; रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
। अलिबाग/खोपोली । प्रतिनिधी ।
राज्यभरात डान्सबारना बंदी असताना आजही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ‘छम छम’ सुरू आहे. त्याविरोधात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला असून, खालापूरमधील तीन डान्सबारवर कारवाई केली. या कारवाईत 32 बारबालांसह 40 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. पुनम, स्वागत, समुद्रा अशी कारवाई केलेल्या डान्सबारची नावे आहेत.
जिल्ह्यात अनेक भागांमध्ये डान्सबारच्या नावाखाली महिलांचे शोषण केले जाते. अवैध धंद्याला यातून ऊत येण्याची भीती निर्माण झाली होती. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डान्सबारमध्ये अश्लील हावभाव करीत संगीताच्या तालावर मुली व महिला नाचत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. त्यामध्ये तीन पोलीस अधिकारी, 22 पोलीस कर्मचारी, सहा महिला पोलीस कर्मचारी तसेच, बांगलादेशी पथकातील एक अधिकारी व महिला अंमलदार यांचा समावेश होता. या पथकाने शनिवारी रात्री समुद्रा बार, हॉटेल, स्वागत बार आणि हॉटेल पुनम बार या तीन डान्सबारवर छापा टाकला. त्यावेळी या बारमध्ये दारू पिऊन असणार्या ग्राहकांसोबत बारबाला नाचत असलेल्या आढळून आल्या.
याप्रकरणी हॉटेल समुद्रातील राहुल यादव व इतर 22, आठ बारबाला, सात ग्राहक आणि बारमधील सात कर्मचारी तसेच स्वागत बारमधील शंख व इतर 28, 12 बारबाला, दहा ग्राहक, बारमधील सहा कर्मचारी आणि पुनम डान्सबारमधील तोश संजीवा मोगविरा व इतर 22, 12 बारबाला, सात ग्राहक आणि बारमधील तीन कर्मचारी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.