। पालघर । प्रतिनिधी ।
मीरा-भाईंदर महानगरपालिकेला एमएमआरडीएकडील रेंटल हाऊसिंग योजना अंतर्गत प्राप्त इमारती या महापालिकेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. यात महापालिकेचे लाभार्थी राहत असतात. परंतु, यातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या लोढा एमएमआरडीए इमारतीत तळमजल्यावर असलेल्या दुकानात बनावट विदेशी मद्य बनविण्याचा कारखाना सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मद्य बनवण्याचे साहित्य आणि मशीन असे जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला भरारी पथकांना देशी, विदेशी व गावठी हातभट्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता कालावधीत माहिम सायन लिंक रोड, मुंबई या ठिकाणी विदेशी मद्याच्या बाटल्या घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. 17 ऑक्टोबर रोजी पाळत ठेवून मोहम्मद नौशाद नसरूद्दीन आलम या आरोपीच्या ताब्यातून 5 बाटल्या (1000 मि.ली.) बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे मीरारोड पूर्वेच्या काशीमिरा भागातील महापालिकेच्या लोढा एमएमआरडीए बिल्डींगच्या तळमजल्यावर छापा घालून बनावटरित्या बनविण्यात आलेल्या विदेशी मद्याच्या दोन बाटल्या, भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या 3 बाटल्या तसेच बनावटरित्या विदेशी मद्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी आवश्यक सामग्री रिकाम्या बाटल्या, झाकणे, लेबल व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.