। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील अवैध धंद्यांविरोधात महाड शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान मंगळवारी (दि.11) केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आणि एक दुचाकी असा एकूण 69 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमित चंद्रकांत साळुंके (38) रा. वरंध, ता. महाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक व त्यांच्या पथकाला महाड एस.टी. बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या हिरवट-पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित व्यक्ती अमित साळुंके याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विविध ब्रँडच्या व्हिस्कीच्या बाटल्या तसेच देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 69 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष ढावरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक, पोलीस हवालदार भोईर, पोलीस शिपाई कांदे, कदम व आंधळे यांनी केली. महाड शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत कारवाईचे स्वागत केले आहे.
महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा
