शेतकरी संघटनेने व्यक्त केला निषेध
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुका शेतकरी संघटनेचे सचिव कैलास पायगुडे यांच्या घरावर निवडणूक काळात तळा पोलिसांनी धाड टाकली असून त्यांच्या संपूर्ण घराची तपासणी करण्यात आली. दरम्यान, या घटनेचा तळा तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.
तळा तालुका शेतकरी संघटनेचे सचिव कैलास पायगुडे हे निवडणूक काळात नागरिकांना पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करीत तळा पोलिसांकडून निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. मात्र, संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यानंतरही हाती काही लागले नसल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. या घटनेची माहिती मिळताच तळा तालुका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कैलास पायगुडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच, ही कारवाई जाणीवपूर्वक सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप करीत अशा दबावाला शेतकरी संघटना बळी न पडता आणखी जोमाने काम करेल असे सांगतानाच त्यांनी या छापेमारीच्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपाध्यक्ष रविंद्र मांडवकर, भानू मंचेकर गुरुजी, गणेश राणे, नितीन साळवी, नामदेव साळवी, दिपक चिंचालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.