कुंटणखाना चालविणारे पश्चिम बंगालमधील दोघे ताब्यात
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरानजीक चेंढरे येथे लोटस लॉजिंगमध्ये अलिबाग पोलिसांनी मंगळवारी (दि.24) सकाळी छापा टाकला. या छाप्यात कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या माध्यमातून पैसे कमविण्याच्या गोरखधंद्यचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील लोटस लॉजिंग येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. वेश्याव्यवसायासाठी पीडित मुलींना प्रवृत्त करीत असल्याचा प्रकार त्यांना समजला. खात्रीशीर सूत्रांकडून माहिती घेऊन अलिबाग पोलिसांनी मंगळवारी (दि. 24) सकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील राजेश चौपाल व ज्योत्स्ना नामक महिला हा धंदा चालवित असल्याचे या छाप्यात दिसून आले. रोख रकमेसह 21 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी राजेश चौपल, ज्योत्स्ना दास यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही परप्रांतीय असून, सध्या ममतानगर येथे राहणारे आहेत. पीडित मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन मिळवित होते, असा घाणेरडा प्रकार तपासाअंती समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.