गर्भपाताचे साहित्य सापडल्याने खळबळ
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथील साई रूग्णालयावर आरोग्य विभागाने छापा टाकला आहे. गर्भपात केंद्राची कोणतीही परवानगी नसताना या रूग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य सापडले आहे. या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे महिलांना दिल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हॉस्पिटलचे मालक डॉ. अनंत नारायण शिगवण (67) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
या रूग्णालयात बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आल्या होत्या. ग्रामीण पोलिसांनाही यावेळी बोलावण्यात आले होते. त्यांनी या रूग्णालयात बनावट रुग्ण पाठवला. यावेळी गर्भपात केंद्राची कोणताही परवानगी नसताना रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे आढळून आले. तसेच, गर्भपाताचे साहित्यही सापडून आले. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी डॉ. अनंत शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले आहे.
