| अलिबाग | वार्ताहर |
मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांचे मार्फत डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली 01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त 13 डिसेंबर रोजी जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे करण्यात आले होते. यामध्ये स्नेहल सचिन जाधव व अविष्कार रविंद्र कदम यांची रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली होती.
दि.18 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन विदयार्थ्यांचा संघ करून महाराष्ट्रातून एकूण 32 संघ ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला.
या राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी अविष्कार रविंद्र कदम, इयत्ता 9 वी, चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे अलिबाग व स्नेहल सचिन जाधव, इयत्ता 9 वी, के. ई. एस . ॲड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यमिक शाळा, अलिबाग या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याला द्वितीय क्रमांक मिळवून दिला असल्याने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांचेकडून विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रु. 4000 रोख पारितोषिक तसेच डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग यांचे हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व यांनी विशेष परिश्रम घेतले.