रायगडला अतिवृष्टीचा धोका

21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोळसणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी, धरणे, शेत जमीनी पाण्याने तुडूंब भरून गेल्या आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसातून मार्ग काढताना अडचणी निर्माण झाल्या. येत्या गुरुवार (दि.21) पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे रायगडला अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दरडग्रस्त व पुरग्रस्त गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



गेली अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. सलग दोन दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे नदी, धरणे, तलाव, विहीरी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत. शेताच्या बांधावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील लघू पाट बंधारे विभागातील धरणेदेखील ओसंडून वाहू लागले. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास व गाढी नदीदेखील पावसाच्या पाण्याने भरून गेल्या. रोहामधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांतील नागरिकांनी सर्तक राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात गुरूवार (दि.21) पर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि.19) रेड, बुधवारी (दि.20) ऑरेंज तसेच गुरुवारी (दि.21) यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात 250 हून अधिक दरडग्रस्त व पुरग्रस्त गावे आहेत, या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मासेमारीसाठी जाऊ नये
जिल्ह्यामध्ये 21 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. कोकण किनारपट्टीत 50ते 60 किलो मीटर ताशी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात ओल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सुचना
जिल्ह्यात तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या कालावधीत पुरजन्य परिस्थितीसह वादळामुळे झाडे कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्याच्या सुचना जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागाने तालुका शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. यादरम्यान शाळा सुरु अथवा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.
पावसावर दृष्टीक्षेप

तालुका- पाऊस (मि.मी)
अलिबाग- 86.00
मुरुड- 80.00
पेण- 82.00
पनवेल - 116.2
उरण- 51.00
कर्जत- 55.00
खालापूर- 60.00
माथेरान - 92.00
रोहा - 120.00
सुधागड - 78.00
माणगाव- 91.00
तळा - 88.00
महाड- 92.00
पोलादपूर - 107.00
श्रीवर्धन - 102.00
म्हसळा - 215.00
एकूण पाऊस - 1515.2
सरासरी पाऊस 94.7 मि.मी
जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी दि. १९ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Exit mobile version