| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सोळा व एकोणीस वर्षाखालील मुलांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघ निवड चाचणी शिबिरामध्ये करण्यात आली आहे. सोळा वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रायगडचा कर्णधार पंकज इटकर,अष्टपैलू खेळाडू आर्यन काळे, साहिल पोपेटा व आर्यन निकाळजे यांना पुणे येथे एमसीए निवड चाचणी व प्रशिक्षण कॅम्पसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या हंगामात सोळा वर्षाखालील मुलांची आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यात घेण्यात आली होती. सदरच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा संघ सुपर लीग फेरीसाठी पात्र झाला होता, साखळी फेरीत वरील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने त्यांची निवड चाचणी शिबिरासाठी करण्यात आली आहे. एकोणीस वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगड संघाचा तंत्रशुद्ध तडाखेबाज फलंदाज आर्यन देशमुख याची निवड करण्यात आली आहे. हे शिबिर जळगाव येथे सुरू होते. तसेच नुकतीच रायगड जिल्ह्याची कन्या रोशनी पारधी हिची निवड महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील युवा गुणवान खेळाडूंची निवड राज्य स्तरावर होत असल्याने रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या क्रिकेट हंगामात रायगड जिल्ह्याचा संघ मुला- मुलींच्या विविध वयोगटात चांगली कामगिरी करेल अशी आशा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.







