रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर; सहकारी संस्थांच्या विकासासाठी जिल्हा बँक कटीबद्ध-आमदार जयंत पाटील

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शनिवारी बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर करत सहकारी संस्थाना कोरोनाजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यामध्ये दिलासादायक बातमी दिली आहे. बँकेने सन २०२०-२१ या वर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ३८.०४ कोटी इतका ढोबळ नफा मिळविलेला असून रु.२३.३२ कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. रायगड जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची बँक असून जिल्ह्यातील सहकारी संस्था ज्यामध्ये पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच इतर सर्व सहकारी संस्था यांच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान देत आलेली आहे आणि यापुढे सुद्धा नक्कीच देणार आहे, त्यामुळे सर्व सहकारी संस्थांनी एकत्रित ध्येय धोरणाने काम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले.

यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, शंकराव म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, बँकेचे सर्व संचालक, बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.यावर्षी बँकेने कोरोना आजाराच्या पार्श्भूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार निवडक सभासदांना सभेमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते आणि सर्व सभासदांसाठी सभेचे नियोजन ऑनलाईन पद्धतीने देखील केले होते, त्यामुळे जिल्ह्यातील सभासदांनी यावेळी दोनही माध्यमातून आपला सहभाग नोंदविला.

१)बँकेचा स्वनिधी ५०० कोटी होणे अभिमानास्पद.

२)बचतगटातील महिलांना अत्याधुनिक ट्रेनिंग देणार.

३)नवीन व्यवसाय उभारणीसाठी मायक्रो फायनान्स त्वरित उपलब्ध करून देणार

४)वि.का.सह.संस्थांचे गोडाऊन उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणार

५) महाड-पोलादपूर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी विशेष कर्जयोजना

५) विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण बँकेच्या खर्चातून पूर्ण  केले.

— आमदार जयंत पाटील ,चेअरमन रा.जि.म.सह.बँक

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकने सातत्याने राज्यातील आणि देशातील बँकांच्या कामगिरीमध्ये आपले यश मिळविताना अनेक पारितोषिके पटकाविली आहेत, परंतु मागील २ वर्षे सर्वांसाठी अतिशय आवाहनात्मक ठरलेली असून यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, व्यवसाय ठप्प झाले आहेत, परंतु आता नवीन उभारणी घेऊन यातून लवकरच बाहेर पडावे लागेल, बँकेने या

काळात ५०० कोटींचा स्वनिधीचा टप्पा पार केला आहे, बँकेच्या दृष्टीकोनातून हा अतिशय महत्वाचा टप्पा असून यापुढील काळातील बदलणारे बँकिंग लक्षात घेता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या धोरणांमध्ये अधिक परिणामकारकता आणि आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करून त्यात नक्कीच यशस्वी होईल असे बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी सभासदांना आश्वासित केले. याच वर्षात नाबार्डचे चेअरमन डॉ.जी.आर.चिंताला यांनी बँकेस भेट देऊन बँकेच्या बचतगटांच्या कामाचे कौतुक करून बँकेला प्रोत्साहित केले. मागील १० वर्षात नाबार्डच्या चेअरमन पदावरील उमेशचंद्र सरंगी, डॉ.प्रकाश बक्षी तसेच यावर्षी डॉ.चिंताला असे तीनही चेअरमन यांनी आपल्या बँकेला विविध कार्यक्रमाप्रसंगी भेट दिलेली असून नाबार्डच्या उच्चपदस्थ अधिका-यांची भेट आणि मार्गदर्शन आपणाला अधिक चांगले काम करण्याची उर्जा देते असे याप्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.  

१)२० वर्षांपेक्षा अधिक काळ ऑडीट मध्ये ‘अ’ वर्ग  

२)२०,००० पेक्षा अधिक बचतगटाच्या माध्यामतून महिला सक्षमीकरण

३) २०% पेक्षा अधिक सीआरएआर 

४)३६०० कोटींचा व्यवसाय हे सर्व मुद्दे बँकेचे प्रगती दर्शविणारे आहेत.

— प्रदीप नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी  

यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात ग्राहकांचे आभार मानत बँकेने बँकेच्या ठेवी आणि कर्जवाटप यामध्ये झालेल्या वाढीबाबत समाधान व्यक्त केले. जागतिक बाजारपेठ आणि भारतीय बँकांमध्ये ठेवींवर दिवसेंदिवस व्याजदर कमी होत असले तरी बँकेच्या ग्राहकांना चांगले व्याजदर नेहमीच दिले जातील याबाबत त्यांनी ग्राहकांना दिलासा आहे.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी बँकेच्या कामगिरीबाबत उपस्थितांना माहिती देताना बँकेने यावर्षी ३६५० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करताना २३५९ कोटींच्या ठेवी १२९५ कोटींचे कर्जवाटप केले असल्याचे सांगितले. तसेच २० वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत बँकेने अ ऑडीट वर्ग मिळविलेला आहे याबाबत आनंद व्यक्त केला. बँकेने आजवर २०,००० पेक्षा अधिक बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण साधत २ लाखापेक्षा अधिक महिलांना बँकिंग प्रवाहामध्ये आणण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केलेला असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. नाबार्ड तसेच रिझर्व्ह बँक यांच्या नियमांचे तंतोतंत पालन करून बँकेने आपल्या कामामध्ये सदैव प्रगती ठेऊन ग्राहकांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण केला आहे असे सांगून बँकेच्या प्रगतीमधील हे सर्व महत्वाचे मुद्दे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रदीप नाईक यांनी सांगितले.

यावेळी महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख,जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर, माणिक जगताप, सुलभा काकू पाटील, माजी संचालक चंदरशेठ, अनंतराव देशमुख,कर्जतचे प्रवीण पाटील,पेण येथील सहकार क्षेत्रातील अभ्यासक केशव( नाना) पाटील, रायगड जि.प. सदस्य तथा कृषी सभापती प्रमोद उर्फ पिंट्या पाटील, बँकेचे कर्मचारी अमित जाधव यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बँकेच्या महाड, पोलादपूर आणि बिरवाडी शाखेमध्ये पुराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना देखील येथील कर्मचा-यांनी तत्परता दाखवित शाखा तात्काळ सुरु करून ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल त्यांचे आणि वसुली विभागातील निरीक्षक यांचे अभिनंदन बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील १२६ विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून विशेष कार्य करणा-या गडब वि.का.से.सह.संस्था-पेण, हाशिवरे वि.का.से.सह संस्था-अलिबाग ,रानवली वि.का.से.सह संस्था-श्रीवर्धन, कोंड्गाव वि.का.से.सह संस्था-रोहा, परळी वि.का.से.सह संस्था-पाली यांचे अभिनंदन बँकेच्या वतीने करण्यात आले.  सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आल्यानंतर उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी आभार व्यक्त करीत सभा संपन्न केल्याचे जाहीर केले.

Exit mobile version